जि.प. शाळा शिडवणे नं. १ मध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
शिडवणे: गणेश चतुर्थीच्या सुट्टीचा मुहूर्त साधत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, शिडवणे नं. १ येथे आज, शुक्रवार, २९ ऑगस्ट २०२५ रोजी शाळेच्या पहिल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला माजी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि तो यशस्वीपणे पार पडला.
शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, या हेतूने शाळेच्या वतीने व्हॉट्सॲप ग्रुप आणि इतर माध्यमांतून मुंबई, पुणे, आणि इतर शहरांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेल्या माजी विद्यार्थ्यांना मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत गावातील आणि शहरातून आलेले अनेक माजी विद्यार्थी या मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
या मेळाव्याला सरपंच रविंद्र शेट्ये, राष्ट्रपती पदक प्राप्त निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिनेश रांबाडे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल पांचाळ, सुधाकर भोवड, मधुकर गुंडये, पांडुरंग गुंडये, दत्ताराम वारिसे, रामदास टक्के, मनोहर टक्के, सुरेश टक्के, गुरुदास टक्के, अनिल गुंडये, विलास कुडतरकर, मंगेश शेट्ये, योगेश सुतार, ईश्वर पांचाळ, निलेश पांचाळ, मंगेश सुतार, संतोष टक्के, प्रशांत वाघरे, प्रसन्न वाघरे, गणेश वाघरे हे माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कणकवली पंचायत समिती गट साधन व्यक्ती सचिन तांबे यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली.
माजी विद्यार्थी संघाची स्थापना
यावेळी सर्वानुमते माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या संघासाठी प्रत्येक वाडीतून प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पाष्टेवाडीमधून दत्ताराम राजाराम वारिसे आणि दिनेश सहदेव रांबाडे, सुतारवाडीमधून ईश्वर रवींद्र पांचाळ आणि अनिल रमेश पांचाळ, टक्केवाडीमधून रामदास यशवंत टक्के आणि मनोहर नारायण कोकाटे, भोवडवाडीतून मधुकर रामचंद्र गुंडये आणि सुधाकर कान्होबा भोवड, गावठणवाडीतून विलास भिकाजी कुडतरकर आणि समीर सदाशिव कुडतरकर, तसेच बौद्धवाडीतून रवींद्र शंकर तांबे आणि सुधांत सुरेश तांबे यांची निवड करण्यात आली. शाळेच्या वतीने आणि गावकऱ्यांच्या वतीने या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मेळाव्याच्या सुरुवातीला शाळेसाठी योगदान दिलेल्या अनेक दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विश्वनाथ रानडे, दत्ताराम विश्राम शेट्ये, लक्ष्मण गोविंद टक्के, शंकर नारायण भोवड, दाजी हर्या भोवड, गुणाजी रामचंद्र गुंडये, श्रीधर तुकाराम टक्के, मोतीराम तुकाराम टक्के, बाबी काळशेठ टक्के, बंडू गणशेठ टक्के, भाऊ रानडे, धर्मा शेख, अनंत सुतार, शांताराम सुतार, सहदेव सुर्वे, शंकर गिरकर, बाळाप्पा सोनाप्पा ब्रम्हदंडे यांसारख्या अनेक दिवंगत विद्यार्थ्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली.
माजी विद्यार्थ्यांचा सकारात्मक अनुभव
साधनव्यक्ती सचिन तांबे यांनी उपस्थितांना सुंदर गीते आणि अभिनयाचा अनुभव दिला. अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करताना शाळेबद्दलचे आपले प्रेम व्यक्त केले. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या काळात आणि आताच्या शाळेत झालेल्या सकारात्मक बदलांची प्रशंसा केली. तसेच, मुंबईमध्येही माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याचा मानस काहींनी व्यक्त केला.
सरपंच रवींद्र शेट्ये आणि मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी मेळाव्याला उपस्थित राहिलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. माजी विद्यार्थ्यांच्या सहभागाने आणि उत्साहाने हा पहिला मेळावा यशस्वी ठरला.










































No comments:
Post a Comment