🔴 स्वामी समर्थ मठ ट्रस्टतर्फे शिडवणे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिडवणे: सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ मध्ये स्वामी समर्थ मठ ट्रस्ट (कल्याण) यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. श्री. सुरेश कदम आणि गौरांग कदम यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. या उपक्रमामुळे शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गासाठी लागणारे सर्व प्रकारचे स्टेशनरी साहित्य उपलब्ध झाले.
या कार्यक्रमाला सरपंच रवींद्र शेट्ये, अध्यक्ष दिनेश रांबाडे, उपाध्यक्षा संचिता टक्के, रामदास वारिसे, बाणे, तारीफ शेख, अरविंद धाक्रस, मानसी रांबाडे, सुरेश कदम, गौरांग कदम, गोविंद वाघरे, उर्मिला सुतार, समिता सुतार, उपशिक्षिका सीमा वरुणकर, हेमा वंजारी आणि सुरेंद्र यादव यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून झाली. याप्रसंगी सरपंच रवींद्र शेट्ये आणि देणगीदार सुरेश कदम यांनी विद्यार्थ्यांसमोर मनोगत व्यक्त करत त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी स्वामी समर्थ मठ ट्रस्ट आणि श्री. सुरेश कदम व गौरांग कदम यांचे विशेष आभार मानले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळत असल्यामुळे त्यांच्या प्रगतीला मोठा हातभार लागतो.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. प्रवीण कुबल यांनी केले. या शैक्षणिक साहित्य वाटपामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शाळेच्या वतीने सरपंच रविंद्र शेट्ये यांनी सुरेश कदम यांचा शाल, श्रीफळ देऊन गौरव केला.






























No comments:
Post a Comment