🔴 शिडवणे नं. १ शाळेचा अभिनव उपक्रम: झाडांना ‘वृक्षाबंधन’
शिडवणे: रक्षाबंधनाचा पारंपरिक सण साजरा करताना शिडवणे नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणावर प्रेम करण्याचा अनोखा संदेश दिला. भगतसिंग स्काऊट पथक आणि छत्रपती शिवाजी महाराज कब पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी झाडांना राख्या बांधून ‘वृक्षाबंधन’ हा आगळावेगळा उपक्रम राबवला.
पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मुलांनी ‘झाडे सुद्धा आपले बंधू आहेत’ हा विचार कृतीत आणला. त्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्या शाळेच्या परिसरातील झाडांना बांधल्या. या उपक्रमातून ‘पर्यावरणावर, निसर्गावर प्रेम करा’ असा संदेश देण्यात आला.
शाळेने यापूर्वीच ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला असून, विद्यार्थ्यांनी आपल्या घरी झाडे लावली आहेत. शाळेच्या आवारातही नवीन झाडे लावून त्यांची निगा राखण्याचे काम विद्यार्थी नियमितपणे करतात.
स्काऊट चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचा, ती जगवण्याचा आणि झाडे न तोडण्याचा संदेश दिला जातो. ‘वृक्षाबंधन’च्या या उपक्रमाने या संदेशाला आणखी बळकटी मिळाली.
यावेळी स्काऊट मास्टर तथा शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल, फ्लॉक लीडर सीमा वरुणकर, अंगणवाडी सेविका प्रियांका पाटणकर आणि पोषण आहार सेविका समिता सुतार उपस्थित होत्या. या अनोख्या आणि स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.






No comments:
Post a Comment