🔴 शिडवणे नं. १ शाळेत 'गणपतीच्या गोष्टी व गाणी' उपक्रम उत्साहात
शिडवणे, दि. २२ ऑगस्ट (प्रतिनिधी) - येथील शिडवणे नं. १ शाळेमध्ये शुक्रवारी, २२ ऑगस्ट रोजी 'गणपतीच्या गोष्टी आणि गाणी' हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. गणेश चतुर्थी जवळ आल्यामुळे घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला आणि त्यांच्यातील भक्तीभाव, आकलनशक्ती आणि एकाग्रता यांनाही चालना मिळाली.
शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. मुलांना गणपतीविषयी असलेल्या स्वाभाविक आकर्षणाचा उपयोग करून कुबल यांनी गणेश पुराणातील बाल गणेशाच्या गोष्टी मुलांना ऐकवल्या. लहान मुलांना गोष्टी ऐकण्यात विशेष रुची असल्यामुळे, गोष्टी सुरू असताना पहिली आणि दुसरीतील विद्यार्थ्यांसह सर्व मुले तल्लीन होऊन ऐकत होती. गोष्टींनंतर कुबल यांनी मुलांना त्यांवर आधारित प्रश्न विचारले. मुलांनीही लक्षपूर्वक ऐकल्यामुळे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.
गोष्टींबरोबरच या उपक्रमात गाण्यांचाही समावेश होता. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' आणि 'गणुल्या रे' ही गणेश बालगीते ऐकताना मुलांनी ठेका धरला. तसेच श्रीधर मुणगेकर बुवा यांचे 'काटा रुतला अहंकाराचा' हे भजनही घेण्यात आले. या उपक्रमामुळे मुलांच्या मनात 'आतुरता माझ्या गणेशाची' हा भक्तीभाव जागृत झाला आणि गणेशोत्सवासाठी त्यांच्यातील उत्सुकता अधिक वाढली.

No comments:
Post a Comment