Saturday, August 9, 2025

🔴 शिडवणे नं. १ कल्पना चावला गाईड पथकाचा स्तुत्य उपक्रम; शिडवणे गावातील दुकानांमध्ये ‘व्यसनमुक्ती राखी’



🔴 शिडवणे नं. १ कल्पना चावला गाईड पथकाचा स्तुत्य उपक्रम; शिडवणे गावातील दुकानांमध्ये ‘व्यसनमुक्ती राखी’

          शिडवणे: रक्षाबंधनाचा पारंपरिक सण साजरा करत असताना, शिडवणे नं. १ च्या कल्पना चावला गाईड पथकाने एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवून या सणाला सामाजिक संदेशाची जोड दिली. शाळेतील विद्यार्थिनींनी शिडवणे गावातील दुकानांना भेटी देऊन तेथील सर्वांना राख्या बांधल्या आणि व्यसनमुक्तीचा संदेश दिला.
          शाळेतील रक्षाबंधन कार्यक्रम झाल्यानंतर, या गाईड पथकाने परिसरातील विविध दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना प्रेमाने राख्या बांधल्या. यावेळी त्यांनी दुकानदारांना एक खास विनंती केली. “आमच्या भावांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी, १८ वर्षांखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकू नका,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
          मुलींच्या या आवाहनामुळे दुकानदार भारावून गेले. त्यांनी मुलींना खाऊ दिला आणि त्यांच्या विनंतीचा आदर करत, यापुढे व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल दुकानदारांनी विद्यार्थिनींचे आणि शाळेचे कौतुक केले.
          या उपक्रमावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ज्ञ मनोहर कोकाटे, शाळेचे मुख्याध्यापक तथा स्काऊट मास्टर प्रवीण कुबल, क्रीडा शिक्षक सुरेंद्र यादव आणि दुकानांमधील ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा आगळावेगळा नवोपक्रम निश्चितच समाजाला एक सकारात्मक दिशा देणारा ठरला.

















 

No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...