Wednesday, August 6, 2025

🔴 पोलीस कॉन्स्टेबल तेजस्वी नामये हिची शिडवणे नं. १ शाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मिळाले प्रेरणास्थान



🔴 पोलीस कॉन्स्टेबल तेजस्वी नामये हिची शिडवणे नं. १ शाळेला सदिच्छा भेट; विद्यार्थ्यांना मिळाले प्रेरणास्थान

शिडवणे, दि. ६ ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी): शिडवणे नं. १ शाळेची माजी विद्यार्थिनी आणि आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्वी दत्तात्रय नामये हिने नुकतीच आपल्या शाळेला सदिच्छा भेट दिली. आपल्या शाळेतील विद्यार्थिनी पोलीस अधिकारी झाल्याचे पाहून सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे आणि कौतुकाचे वातावरण पसरले होते. पोलीस वेशात आलेल्या तेजस्वीला पाहून मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती. तिच्या या भेटीमुळे शाळेतील सर्व मुलांना एक नवा आदर्श आणि प्रेरणा मिळाली.

          सध्या सिंधुदुर्गनगरी येथे कार्यरत असलेल्या तेजस्वीचे प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून, घरी आल्यानंतर तिला आपल्या जुन्या शाळेला आणि शिक्षकांना भेटावेसे वाटले. शाळेत आल्यानंतर तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तिने पोलीस पदापर्यंत पोहोचताना केलेला संघर्ष, अपार कष्ट आणि अभ्यासाचा प्रवास मुलांसोबत शेअर केला. तिच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाचे महत्त्व आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द दिसून आली.

          या भेटीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी तेजस्वीचे आभार मानले. शाळेच्या वतीने तिला 'How to talk to any one' या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. तिची ही अनपेक्षित भेट विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अविस्मरणीय ठरली. तिच्या डोळ्यातील चमक आणि कर्तृत्वाचा रुबाब पाहून अनेक मुलांच्या मनात 'आपणही तिच्यासारखे बनावे' हे स्वप्न फुलले.

          यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, उपमुख्याध्यापिका सीमा वरुणकर, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी, उपशिक्षक सुरेंद्र यादव आणि शालेय पोषण आहार ताई समिता सुतार उपस्थित होते.












No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...