Saturday, August 31, 2024

आनंददायी शनिवार : ३१ ऑगस्ट २०२४

🛑 आनंददायी शनिवार : ३१ ऑगस्ट २०२४


आज शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी शिडवणे नं . १ शाळेत अत्यंत मुद्देसूद विषय घेऊन नियोजनपूर्वक शनिवार साजरा करण्यात आला. त्यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी आणि चारही शिक्षक विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. 

मुलांनी आपल्या गटाच्या नियोजनप्रमाणे परिपाठ घेतला. त्यानंतर मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्व मुलांना ‘ Five Potato Wadas ‘ चे इंग्रजी गाणे अभिनयासह घेतले. त्यात सर्व मुलांना सहभागी करून घेतले होते. सर्व मुलांनी आनंदाने गाणे म्हटले आणि अभिनय देखील साजेसा केला. 

मुलांना मौन स्थितीमध्ये बसवून ‘ प्रणव ध्यान ‘ घेण्यात आले. त्यात दोन ते तीन मिनिटांनंतर आपल्या आवडत्या देवतेची प्रतिमा डोळ्यासमोर आणण्यासाठी सूचना देण्यात आल्या. मुलांनी तसे केले. मुले सुचनेचे काटेकोरपणे पालन करताना दिसत होती. त्यानंतर मुलांनी सरांनी सांगितलेला शांती मंत्र म्हटला. प्रणव ध्यान पूर्ण केले. मुलांना शांत बसणे किंवा त्यांना शांत बसवणे सध्या अवघड गोष्ट झाली आहे. त्यासाठी मुलांनी शांत बसून , डोळे बंद करून संध्याकाळी किंवा सकाळी आपल्या देवतेसमोर मांडी घालून बसावे असा शिरस्ता ठेवला तर नक्की जमू शकते. त्याचा परिणाम सकारात्मक होणार आहे. कारण मुलांना चिंतन करता येईल आणि त्यांची एकाग्रता वाढेल. 

          त्यानंतर शिक्षकांनी आणि मुलांनी टंग ट्विस्टर नावाचा मनोरंजक खेळ खेळला. त्यात कच्चा पापड पक्का पापड, खडक सिंग के खडकने से खडकती है खिडकिया खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंग, काळे राळे गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले, चंदू के चाचा ने चंदू की चाची को चांदी के चम्मच से चटणी चटाई, काका काकीवर का कावले कारण काकीने काकांचे कपाटातील काही कागद कात्रीने करा करा कापले अशी मजेदार वाक्य देऊन ती मुलांनी आणि शिक्षकांनीही पुन्हा पुन्हा म्हणून त्यातील गंमत अनुभवली. 

          मुलांना किराणा दुकानातील माहिती असते त्यामुळे किराणा दुकानाला भेट देण्याची त्यांना सवय असते. त्यामुळे वर्गातच किराणामालाचे दुकान थाटण्यात आले. नमुना म्हणून शिक्षक दुकानदार झाले आणि विद्यार्थी गिऱ्हाईक झाले. एक स्किट सादरीकरण केल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वतः अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण केले. फरान तारीफ शेख याने उत्कृष्ट सादरीकरण केले. 

       मुलांना आपली स्वतःची दिनचर्या सांगता येणे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपले डेली रुटीन आपल्याला माहित असायला हवे. आपण ज्या दैनंदिन गोष्टी करतो त्या आपल्याला सांगताही यायला हव्यात. आमच्या शाळेतील धनश्री सुतार केतन सुतार यांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपली दिनचर्या सांगितली. माझी दिनचर्या या विषयावर आधारित दहा ओळी माहिती लिहून आणण्यास सांगण्यात आली. 

          मुले शाळेमध्ये आल्यानंतर शाळेत सांगितलेली सर्व कामे करत असतात. परंतु घर कामांमध्ये मात्र आई-वडिलांना ते नकार देण्याचे काम जास्त प्रमाणात करताना दिसतात. घर कामांमध्ये सुद्धा श्रमप्रतिष्ठा आहे हे मुलांना समजायला हवे. घरातील कामे घरातील मोठी माणसे करत असतात. त्यांना हातभार लावून घर कामांमध्ये थोडी मदत करायला हवी हेही मुलांना समजायला हवे. काही मुलांनी आपण घर कामांमध्ये मदत करताना कोणती कामे करतो ते सांगितले. 

          सूक्ष्म व्यायाम प्रकार आपण नेहमी करायला हवेत. योगासनाच्या अगोदर आपण सूक्ष्म व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे योगासने किंवा कवायत प्रकार करण्यासाठी आपले शरीर आपण तयार करत असतो. दरवेळी सूक्ष्म व्यायाम करणे, आपल्या स्नायूंना शिथिलता देणं हे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व प्रात्यक्षिके घेतली. 

         दिपक काळेल सरांनी सर्व मुलांना आपत्ती व्यवस्थापन विषयक अतिशय तपशीलवार माहिती दिली. आपत्ती येण्यापूर्वी आपत्ती आल्यानंतर व आपत्ती येऊन गेल्यानंतर काय करावे याबाबतची माहिती सरांनी दिली. डिझास्टर मॅनेजमेंट संदर्भातला धडा मुलांनी अगोदर वाचलेला होता. शाळेमध्ये अचानक एखादी आपत्ती उद्भवली तर काय करावे यासंदर्भातले मॉकड्रिल सुद्धा घेण्यात येईल असे सरांनी सांगितले. सरांनी विचारलेल्या प्रश्नांची मुलांनी व्यवस्थित उत्तरे दिली. 

          परिसर भेट मध्ये मुलांनी शाळेतील परिसराला भेट दिली आणि परिसरातील विविध झाडांची नावे सांगितली. हेमा वंजारी मॅडम यांनी सहावी सातवीच्या मुलांकडून कडधान्यांपासून विविध प्रतिकृती तयार करून घेतल्या. 

          संगणकाची निगा कशी राखावी या संदर्भात प्रवीण कुबल सर यांनी मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी संगणकाचे सर्व भाग समजावून सांगितले. मॉनिटर,  सीपीयू, कीबोर्ड,  माऊस, स्पीकर या सर्वांची कशी निगा राखावी हे त्यांनी समजावून सांगितले. 

          इतिहासातील किल्ले आणि दुर्ग यांची माहिती गोळा करून त्याबद्दल प्रोजेक्ट बनवण्यासाठी वरच्या वर्गातील मुलांना उद्युक्त करण्यात आले. एकंदरीत आजचा शनिवार दप्तराविना झाला. दप्तराशिवाय सुद्धा मुले शाळेमध्ये अतिशय आनंददायी पद्धतीने शिकू शकली याचा शिक्षकांनाही आनंद वाटला. 

 

          

          


























 






No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...