Tuesday, August 20, 2024

🛑 सोहळा रक्षाबंधनाचा

🛑 सोहळा रक्षाबंधनाचा

          आज मंगळवार दिनांक २० ऑगस्ट रोजी शिडवणे नं. १ शाळेत रक्षाबंधनाचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनी दोन्ही आतुर असल्याचे दिसले. सोबत पालक, शिक्षक, अंगणवाडी ताई आणि महिला पदाधिकारी यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता. 

         सकाळी गेल्यागेल्या मुले मुली राख्या आणून दाखवित होत्या. आपण केलेल्या गोष्टीचं कौतुक होणारच या अपेक्षेने सर्वच मुली अधीर होऊनच आपण बनवलेली राखी दाखवत होत्या. आम्हीसुद्धा त्यांचं तोंड भरुन कौतुक करतच होतो. मुलांना शाबासकीची थाप हवी असते. ती त्यांना मिळताना दिसत होती. 

         सर्व मुलींनी राख्या प्रदर्शनासाठी मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांचं परीक्षण करणं सोपं गेलं. काही मुलांनी तयार राख्या आणून दिल्या होत्या. तरीही आम्ही त्याही स्वीकारल्या. काही मुलींनी मात्र आपलं कसब वापरलं. स्वतःची कल्पना सत्यात उतरवून ते सत्यच त्यांच्या हातात बोलत उभं होतं. 

         परीक्षक शिक्षकांनी परीक्षणाचं महत्त्वाचं कार्य पूर्ण केलं होतं. नंबर काढले गेले. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त नऊ मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. उपक्रम नेहमीचाच असला तरीही त्यात थोडी नावीन्यता आणली होती.  बनवून आणलेल्या राख्यांचा उपयोग शालेय रक्षाबंधनासाठी करण्यात आला होता हे विशेष होते. 

         सर्व मुलींनी सर्व मुलांचे अनुक्रमे औक्षण करुन राखी बांधली होती. आमची मुले शालेय रक्षाबंधनाची नेहमीच वाट बघत असतात. मुलगे आनंदले होते. प्रत्येकाच्या हातात खाऊ होता. तो खाऊ स्वतः न खाता आपल्या बहिणींना द्यायचा होता. सर्वांनी रांगेने व शिस्तीत रक्षाबंधन केले होते.  त्यामुळे त्यांचे फोटोही कँडीड आले. खरंच अशी ही निरागस मुलं आम्हांला सतत समोर असतात आमचं ऐकण्यासाठी. ही आमच्यासाठी कितीतरी आनंदाची गोष्ट आहे. ही मुलं आहेत म्हणूनच आम्हांला सन्मान मिळतो आहे हे आम्ही आमचं भाग्य समजतो. 

         आमच्या शाळेत स्काऊट, गाईड, कब आणि बुलबुल अशी चारही पथके स्थापन केली आहेत. लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या या चळवळीत मुलांचं बालपण अधिक समृद्ध होणार यात शंका नाही. एका बुलबुल मुलीने एक भलीमोठी राखी बनवून आणली होती. तिच्या पथकाने ती समुहाने झाडाला बांधली. स्काऊटच्या मुलांनी ती पाहिली आणि कामाला लागले. अर्ध्या तासात त्यांनीही अतिशय सुंदर राखी बनवली. त्यांच्या पथकाने राखी बांधताना त्यांच्याकडे पाहत राहावे असे वाटत होते. खरंच मुलांनी  झाडांवर प्रेम करत राहायला हवे. आपला देश कृषी प्रधान देश आहे. आपल्या देशातील मुले अशीच झाडांवर निरतिशय प्रेम करत राहणारी पर्यावरणप्रेमी तरच निपजतील यात शंका नाही. 

         शिक्षकांना शिक्षिकांनी, पदाधिकारी महिलांनी, अंगणवाडी ताईंनी रक्षाबंधन केले. श्रावणातील हा सण भावाबहिणीच्या अतूट नात्यांचा सण आहे. मुलांनी फक्त प्रतिज्ञा म्हणून चालणार नाही तर अशा उपक्रमामधून ती प्रत्यक्ष आचरणात आणत राहायला हवी. हे संस्कार रुजविण्याचं बीज आमच्याकडून पेरलं जातं हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो. हा उपक्रम मा. शिवरामभाऊ जाधव यांच्या सौजन्याने दरवर्षी साजरा होत असतो म्हणून त्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ व शिक्षकवृंद यांच्यावतीने आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. १











































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...