शुक्रवार दिनांक २८ ऑगस्ट २०२४ रोजी शिडवणे नं. १ शाळेतील पाचवी ते सातवीच्या २६ मुलांनी शिक्षकांसह शिल्पकार श्री. सुनिल मधुकर पांचाळ ( शिडवणे सुतारवाडी ) यांच्या श्रीगणेश मूर्तीशाळेला कार्यानुभव विषयांतर्गत ' क्षेत्रभेट ' दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात ' कार्यानुभव ' विषयाला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शाळेतील मुलांसाठी क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात येते. क्षेत्रभेटींमधून मुलांना विविध स्थानिक व्यवसाय व उपक्रमांची माहिती व्हावी हा प्रमुख उद्देश असतो. शालेय परिसरातील व्यावसायिकांची व त्यांच्या व्यवसायांची क्षेत्रभेट घेतल्यास भावी शिल्पकार आणि व्यावसायिक निर्माण होण्यासाठी क्षेत्रभेटी महत्त्वाची भूमिका बजावतात.
शिडवणे नं. १ शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीची मुले मूर्ती शाळेतील आकर्षक व सुबक मूर्ती पाहून भारावून गेलेली दिसली. श्री गणेशांच्या विविध अवतारातील मुर्त्यां पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी शिल्पकार सुनील पांचाळ यांची मुलाखत घेतली. शिल्पकार सुनील पांचाळ म्हणाले , " सन 1952 पासून आम्ही श्री गणेशाच्या मुर्त्या बनवतो. आज जवळजवळ ७२ वर्षांपूर्वीची परंपरा आम्ही जोपासत आहोत. आम्ही शाडूच्या मूर्ती बनवतो. पर्यावरण पूरक कागदी लगद्याच्या मूर्ती सुद्धा बनवतो. शाडूच्या मूर्ती खूप महाग असतात. कागदी लगद्यापासून बनवलेल्या मूर्ती तर खूपच महाग असतात. लोकांच्या मागणीप्रमाणे आम्ही मुर्त्या बनवून देतो. यावर्षी आम्ही 150 गणेश मुर्त्या बनवलेल्या आहेत. आमच्याकडे कमीत कमी 1100 रुपयांची मूर्ती आहे. तर जास्तीत जास्त 7000 रुपयांपर्यंतच्या मुर्त्या आहेत. वडिलोपार्जित मिळालेला हा कलेचा वारसा आम्ही असाच जपणार आहोत. माझी दोन्ही मुले श्रेयांश आणि शुभ्रा मूर्ती कलेत पारंगत आहेत. माझी पत्नी, माझी आई आणि घरातील कुटुंबीय मला मूर्तीशाळेत खूप सहकार्य करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माझ्याकडे अनेक मूर्तिकार येऊन रंगकामाचे कॉम्प्रेसर दुरुस्त करून घेऊन जातात. "
एक फुटापासून आठ फुटापर्यंतच्या श्रीगणेशाच्या मुर्त्या मुलांनी पाहिल्या. त्यावेळी शाळेतील पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी मॅडम उपस्थित होत्या. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी शिल्पकार सुनील पांचाळ यांनी दिलेल्या माहितीबद्दल हार्दिक आभार मानले. सौ स्नेहा सुनील पांचाळ यांनी सर्व मुलांना चहा व खाऊ दिला.
































No comments:
Post a Comment