शिडवणे शाळेत 'बांधावरची शाळा' उपक्रम उत्साहात, कृषी दिनाचेही आयोजन!
शिडवणे, १ जुलै २०२५: आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिडवणे नं. १ येथे 'बांधावरची शाळा' हा क्षेत्रभेटीचा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यासोबतच, डॉ. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या महाराष्ट्र कृषी दिनाचेही उत्तम आयोजन शाळेत करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती असलेले सहाय्यक कृषी अधिकारी सागर चव्हाण यांच्या हस्ते डॉ. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. सांगुळवाडी कृषी महाविद्यालयातील कृषी दूत राहुल पळसकर आणि निशांत माने यांनी जयंतीनिमित्त डॉ. नाईक यांच्या कार्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सागर चव्हाण यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
कार्यक्रमाची सुरुवात शिडवणे गावाच्या नकाशाच्या अनावरणाने झाली, जो कृषी दूतांनी विशेष प्रयत्नाने तयार केला होता. त्यानंतर, शाळेतील सर्व विद्यार्थी 'बांधावरची शाळा' उपक्रमासाठी शेताकडे निघाले. भोवडवाडी येथे पृथ्वीराज नरके, निशांत माने, तेजस येडगे, दिग्विजय जांभळकर, दिग्विजय संकपाळ, अभंग सलगर, राहुल पळसकर, वेंकटेश्वर रेड्डी, ऋतेश यादव आणि अश्रफ उस्मान या कृषी दूतांनी विविध तक्ते आणि प्रोजेक्ट्सच्या साहाय्याने बीजांकुरण, पिकाच्या जाती, बियाणे, काजू खत व्यवस्थापन, जैविक व रासायनिक पद्धती, नत्र-स्फुरद-पालाशचे महत्त्व, चार सूत्री भात लागवड, गिरीपुष्प, कंपोस्ट खत खड्डा, आणि माती परीक्षण या सर्वांची प्रात्यक्षिके करून दाखवली.
त्यानंतर, विद्यार्थ्यांनी रघुनाथ भोवड यांच्या शेताच्या मळ्याला भेट दिली आणि तिथे 'श्री' पद्धतीची लावणी प्रत्यक्ष अनुभवली. सहाय्यक कृषी अधिकारी सागर चव्हाण आणि सर्व कृषी दूतांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी स्वतः लावणी करण्याचा अनुभव घेतला. याचवेळी, मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सहाय्यक कृषी अधिकारी सागर चव्हाण, पदवीधर शिक्षिका हेमा वंजारी, कृषी दूत राहुल पळसकर आणि शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. वाटेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत, भगतसिंग स्काऊट पथकाच्या सहकार्याने आणि सांगुळवाडी कृषी महाविद्यालयीन कृषी दूतांच्या सौजन्याने शाळेच्या परिसरात दोन बदामाची झाडे लावण्यात आली. मुख्याध्यापकांनी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शेती आणि कृषी विज्ञान अधिक जवळून समजून घेण्याची एक अनोखी संधी ठरला.
















































































































































































































































































No comments:
Post a Comment