🔴 इंग्रजी संभाषण वर्ग : सुधाकर भोवड यांचा अभिनव उपक्रम
शिडवणे: आपली मुले इंग्रजी संभाषणात मागे राहू नयेत, यासाठी शिडवणे नं. १ शाळेचे माजी विद्यार्थी सुधाकर भोवड यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून ते दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी खास मुंबईहून येऊन मुलांना इंग्रजी वाक्यांचा सराव देत आहेत.
नोकरीच्या काळात त्यांना स्वतःला इंग्रजी भाषेची उणीव जाणवली. कार्यालयात आत्मविश्वासपूर्वक काम करण्यासाठी इंग्रजीचे ज्ञान किती महत्त्वाचे असते, हे त्यांना अनुभवाने कळले. याच जाणिवेतून, आपल्या शाळेतील सध्याच्या मुलांना ही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी हा 'नवोपक्रम' सुरू केला आहे.
या उपक्रमांतर्गत, भोवड यांनी स्वतः इंग्रजी वाक्यांचा संग्रह तयार केला आहे. या वाक्यांच्या प्रती ते मुलांना देतात आणि एक दिवस शाळेत येऊन स्वतः शिकवतात. मुलेही या उपक्रमाला उत्साहाने प्रतिसाद देत आहेत. मुलांचा हा प्रतिसाद पाहून त्यांना खूप आनंद होतो. आज मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी त्यांनी या उपक्रमाची पाचवी तासिका घेतली.
आपल्या शाळेतील मुलांसाठी निवृत्तीनंतरही मार्गदर्शन सेवा देण्याच्या त्यांच्या या कार्याबद्दल शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायत शिडवणे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. सुधाकर भोवड यांचा हा अभिनव उपक्रम इतर माजी विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

No comments:
Post a Comment