🔴 शिक्षण क्षेत्राला एआयची जोड: कणकवलीमध्ये शिक्षकांसाठी विशेष प्रशिक्षण संपन्न
कणकवली, २५ सप्टेंबर २०२५: आज कणकवली पंचायत समिती आणि युवा संदेश प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनाची प्रक्रिया अधिक प्रभावी कशी करावी, याचे मार्गदर्शन मिळाले.
या कार्यक्रमाला कणकवली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत आणि प्रेरणा मांजरेकर, तसेच ग्रामविस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक म्हणून नितीन पाटील यांनी शिक्षकांना AI च्या विविध उपयोगांविषयी सखोल माहिती दिली. त्यांना दीपक काळेल यांनी सहाय्य केले. कणकवली तालुक्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांनी या प्रशिक्षणात उत्साहाने सहभाग घेतला. या प्रशिक्षणादरम्यान, ज्ञानज्योती गटाने इयत्ता सहावीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि इंग्रजी या विषयांवर आधारित दर्जेदार प्रश्नसंच आणि PDFs तयार केले, जे विशेष कौतुकास्पद ठरले. इतर सर्व गटांनीही उत्तम प्रकारे मार्गदर्शन घेऊन स्वतःचे प्रश्नसंच आणि शैक्षणिक साहित्य तयार केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत मर्गज यांनी केले, तर आभारप्रदर्शन संदीप तांबे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महेश चव्हाण आणि प्रमोद पवार यांनी विशेष सहकार्य केले. प्रशिक्षणार्थींच्या वतीने प्रवीण कुबल यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि या प्रशिक्षणाबद्दल समाधान व्यक्त केले.







No comments:
Post a Comment