Saturday, July 6, 2024

आनंददायी शनिवार : एक दिवस पानांचा

 







🛑 एक तास पानांचा


      विज्ञान शिकविताना शाळेत विविध प्रात्यक्षिके घेतली जातात. मुले सतत निरीक्षण करीत असतात. त्यांची निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा खूपच जलद असते. 

        विज्ञान आणि परिसराभ्यास या विषयांना पूरक असा अभ्यास विषयक उपक्रम घेण्याचे मनात होते. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सामील करुन घेता आले तर ? हा प्रश्न सतावत होताच. शिक्षकाच्या मनात प्रश्न आला कि त्याचं आव्हानात रूपांतर होतं असतं. कोणतेही आव्हान हसतमुखाने स्वीकारणारे अनेक शिक्षक खऱ्या अर्थाने अध्ययनासाठी मुलांना तयार करीत असतात. 

       परिसरातील झाडांचं निरीक्षण करणारी मुले त्यांच्या पानांना ओळखत असतात. तरीही परिसरात उपलब्ध नसणारी झाडे नेहमीच मुलांसाठी अनोळखी राहून जातात. सर्व मुलांना जास्तीत जास्त झाडांची माहिती व्हावी हा उद्देश सफल होण्यासाठीचा उपक्रम सार्थकी लागला. 

        मुलांना पाने आणण्याचे आव्हान दिले होते. मुलांना असं काहीतरी हटके करायला आवडत असतं. मी ते सांगितलं आणि विसरूनही गेलो. आज शाळेत आलो मात्र, मुलांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. प्रत्येकाच्या हातात पाने दिसत होती. मी त्यांच्या या कुतूहलाचे हसतमुखाने स्वागत केले. कुतूहल म्हणजे त्यांना प्रत्येकाला आपल्याला माहिती असलेल्या पानांची नावे मला कधी एकदा सांगतो असे झाले होते. पानांची नावे व पाने यांचं सादरीकरण करताना मी मुलांच्या डोळ्यातून ज्ञानरचना पाहत होतो. पहिलीत नव्याने दाखल झालेली मुलेसुद्धा न घाबरता पानांची ओळख सांगत होती. एका मुलाने आपल्या पॅंटीच्या दोन्हीही खिश्यातून पाने काढून दाखवताना मला तो ज्ञानाचा खजिनाच खुला करतोय असे वाटत होते. 

        मी खूप खुश झालो. शैक्षणिक समाधान म्हणजे दुसरे काय असते ? शाळेची सुरुवातही झाली नव्हती. पण मुलांचे शिक्षण कधीच सुरु झाले होते. मी माझ्या मुलांमध्ये मुलासारखाच होऊन गेलो होतो. 

        परिपाठाचा टोल झाला. सगळी मुले परिपाठाला बसली. सर्वांच्या हातात, खिशात पानेच पाने होती. नवीन आलेल्या विज्ञान शिक्षिका वंजारी मॅडम मुलांशी संवाद साधत होत्या. त्यांनी मुलांना पानांचे प्रकार समजावून सांगितले. सर्व मुलांनी ४३ पानांची ओळख करुन दिली होती.आंबा, काजू, चिकू, फणस, वड, पिंपळ, जास्वंद, सोनचाफा, गुलाब, मोगरा, सागवान, आवळा, चिंच, लिंबू , रामफळ, सीताफळ, अशोक, आकेशिया, मयूरपंख, तुळस, न्हिव, रक्तचंदन, धूप, कापूर, सफरचंद, श्रीकृष्ण वड, शेवगा, पपई, चवळी, पारिजातक, अश्वगंधा, आपटा, मोरावळा, करवंद, कढीपत्ता, कडुलिंब,जांभूळ,डाळिंब, शमी, लिंबू, रतांबा, बदाम इतक्या वनस्पतींची माहिती घेताना सर्व मुलांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतलेला मी प्रत्यक्ष पाहत होतो. नवीन बाईं मुलांच्या परिसरात नसणाऱ्या झाडांची पाने मुद्दाम जाऊन एका बागेतून घेऊन आल्याचे समजले आणि मला त्यांचा अभिमान वाटला. अशा विज्ञाननिष्ठ शिक्षकांच्या ताब्यात असणारी मुले विज्ञानप्रेमी होणारच याची मला अधिक खात्री वाटू लागली. शासनाने असे विज्ञान शाखेचे पदवीधर शिक्षक नेमून जिल्हा परिषद शाळेच्या वैभवात अधिक भर घातली आहे. 

        दुपारनंतर मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला अधिक चालना देत पानांपासून गणपतीची आकृती बनवली. मुलांच्या अशा अभिनव कल्पनाशक्तीला खरंच सलाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १


















No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...