🛑 कृपा औदुंबराची
शाळेचा पहिला दिवस आणि औदुंबर सेवा ट्रस्ट यांच्या शैक्षणिक साहित्याची देणगी ही नाधवडे गावातील ट्रस्टच्या सदस्यांनी मुलांसाठी दिलेली अनमोल भेट आहे. पहिल्या दिवशी शासनाकडून मोफत पाठ्यपुस्तके मिळतात. पण पहिल्याच दिवशी वह्या मिळणं म्हणजे मुलांसाठी पर्वणीच. ही सुवर्णसंधी औदुंबरने उपलब्ध करुन दिली ही अभिनंदनीय गोष्ट आहे.
सध्या वह्यांच्या किंमतीही बऱ्याच वाढलेल्या आहेत. त्यामुळे पालकांवर त्याचा भार येऊ नये हा निर्मळ हेतू मनात बाळगत सेवाभावाने वहयांचे दान करणाऱ्या औदुंबर ट्रस्टचे आभार मानावे तितके थोडे होतील.
पूर्वी आम्ही लहान असताना एखादी वही घेतानाही मारामार होत असे. जुन्या वह्यांची उरलेली पाने फाडून वह्या बनवाव्या लागत असत. बायडींग करुन झालेल्या जाड वह्या संपता संपत नसत. बाजारातून आणलेली एखादी वहीसुद्धा आम्हांला त्यावेळी सोन्यासारखी वाटत असे. खरंच दुर्मिळ होत्या आमच्यासाठी त्यावेळी वह्या. आता मात्र शाळेच्या पहिल्या दिवशीच सर्व विषयांच्या वह्या मिळण्याचे भाग्य ह्या मुलांना औदुंबर ट्रस्टमुळे प्राप्त झाले आहे.
ज्यावेळी आपण आपल्या पैशाने एखादी वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्या वस्तूला आपल्या लेखी किंमत असते. पण तीच वस्तू फुकट मिळू लागली की त्याची किंमत समजत नाही. आज मुलांना अनेक उत्तम संधी अशा प्रकारच्या उपक्रमांनी उपलब्ध होत असतील ही त्यांच्यासाठी कायमच आनंदाची गोष्ट असायला हवी.
बालपणी नव्या वह्यांचा वास घ्यायला आम्ही आतुर झालेले असू. कधी एकदा त्यात सुंदर हस्ताक्षर काढतो असे होऊन जाई. आज या काळातील मुलांना पहिल्याच दिवशी असे लेखन साहित्य मिळते आहे हे पाहून आम्हांला त्या काळात अशी संधी प्राप्त झाली असती तर आम्ही याहीपेक्षा जास्त अभ्यास करुन दाखवला असता. पुरेशा वह्या नसतानाही आम्ही प्रत्येक परीक्षेत टॉप करण्याचा प्रयत्न केला आहे. मोठ्या भावंडांनी वापरलेली पुस्तके आम्हांला वापरावी लागत असत. आम्हांला कधीच नवीन पुस्तक मिळालेले नव्हते. आता सरकार दरवर्षी सर्व मुलांना मोफत पाठ्यपुस्तके वितरित करीत असते ही उल्लेखनीय बाब आहे.
" देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे " हात घ्यावे म्हणजे देणाऱ्या माणसाच्या देण्याचा गुणधर्म घ्यावा असे कवी सांगतो. आपण मात्र नेहमी दिलेलं घेत राहतो. द्यायचं विसरूनच जातो. औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे यांच्या या उपक्रमाने आपणांस सर्वांना दानत कशी असावी याचा वस्तुपाठ मिळालेला आहे.
औदुंबर सेवा ट्रस्टने दिलेल्या वह्यांचा दर्जा अतिशय चांगला आहे. या वहयांवर मुले अनेक विषयांचा अभ्यास मन लावून करणार आहेत. मोठे होण्यासाठी त्यांना या वह्यांची होणारी मदत अतिशय मोलाची असणार आहे. या मुलांनीही पुढे मोठे झाल्यावर आपल्या पुढल्या पिढीला अशीच शैक्षणिक मदत करुन उपकाराची परतफेड करावी असा संदेश देणारे कार्यक्रमाचे अध्यक्ष वैभववाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिंगारे साहेब म्हणूनच अधिक लक्षात राहतात.
नारकर बंधू आणि त्यांना सदैव साथ देणारे औदुंबर सेवा ट्रस्टचे समस्त पदाधिकारी सेवाव्रती आहेत. त्यांनी आमच्या शिडवणे नं. 1 शाळेतील 53 पैकी 53 मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी वहयांचे दान दिल्याबद्दल त्यांच्या या अनमोल दानासाठी शिडवणे ग्रामपंचायत सरपंच मा. रविंद्रजी शेट्येसाहेब यांच्या वतीने पुष्पगुच्छ देण्यात आला. मी स्वतः शाळेचा मुख्याध्यापक म्हणून या कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहिलो. माझे मनोगत व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ आणि शिक्षकवृंद यांच्यावतीने मी ट्रस्टचे आभार मानले. आमच्या शाळेतील उपशिक्षिका मा. सुजाता कुडतरकर मॅडम यांनी ट्रस्टकडे प्रस्ताव ठेवताच त्यांनी लगेच मान्य केला हा ट्रस्टचा मोठेपणा. मॅडमनी ही संधी मिळवली म्हणून आम्हांला वह्या प्राप्त झाल्या हेसुद्धा नाकारून चालणार नाही.
आमच्या शिडवणे गावाचे भूषण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी वित्त आणि बांधकाम सभापती मा. रविंद्रजी जठारसाहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी यांनी आम्हांला औदुंबर सेवा ट्रस्टची मदत घेण्यासाठी परवानगी दिली आणि पहिल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात ट्रस्टच्या सेवाभावी कार्याचा उल्लेख केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.
औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे यांच्या सेवाकार्यात सतत सदासर्वकाळ समृद्धी होत जावी आणि दत्ताचा वरदहस्त सदैव त्यांच्यावर राहावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करुन थांबतो.
*©️ प्रवीण अशितोष कुबलसर* ( 9881471684 )
मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. 1 ता. कणकवली










No comments:
Post a Comment