शिडवणे :
शिडवणे नं. १ शाळेमध्ये गेली सात वर्षे अतिशय उत्तम शैक्षणिक कामकाज करणारे माजी मुख्याध्यापक / पदवीधर शिक्षक सुनिल तांबे यांची बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार , शिडवणे सरपंच रविंद्र शेट्ये , निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के , निवृत्त कृषी अधिकारी बंडू कोकाटे , माजी उपसरपंच अनिल पांचाळ यांनी सुनिल तांबे यांच्या कारकिर्दीबद्दल गौरवोद्गार काढले.
क्रीडास्पर्धा , शालेय स्वच्छता आणि विविध सहशालेय उपक्रम राबविण्यात सुनील तांबे यांचा हातखंडा होता. त्यांनी शिडवणे गावातील सर्वांची मने जिंकली होती. त्यांनी केलेले काम कधीच विसरता येणार नाही असे प्रत्येकाच्या मनोगतातून व्यक्त झाले. त्यांनी पुन्हा आपल्या शाळेत यावे असेही आवाहन करण्यात आले.
शाळेच्या सर्व समित्यांच्या वतीने माजी मुख्याध्यापक सुनिल तांबे आणि त्यांच्या पत्नी यांचा सन्मानचिन्ह , शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षकवृंदाच्या वतीने तांबे यांना भेटवस्तू देण्यात आली. अनिल पांचाळ , प्रवीण पाटणकर , मनोहर कोकाटे , रामचंद्र पाटणकर , सचिन टक्के , तारीफ शेख आणि अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांच्या वतीने सुनिल तांबे यांना स्वामी विवेकानंदांची सुस्वरुप मूर्ती सप्रेम भेट देण्यात आली.
सत्काराला उत्तर देताना सुनिल तांबे म्हणाले , " मी शिडवणे गावाचे ऋण कधीही विसरणार नाही. मला या गावात काम करताना खूप आनंद झाला. माझ्या हातून शिकून गेलेल्या मुलांनी खूप मोठे झालेले मला बघायचे आहे. मला या गावाने खूप काही शिकवले आहे. पदाधिकारी आणि पालक यांच्या सहकार्याने शाळेची प्रगती करण्यासाठी मला झालेली मदत मी कदापि विसरु शकणार नाही. "
त्यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाचे समारंभपूर्वक प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले.









































No comments:
Post a Comment