मुलांनो , अभ्यासात उत्तुंग भरारी घ्या : माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्रजी जठार
शिडवणे : प्रतिवर्षी १५ जून रोजी शाळेचा पहिला दिवस संपन्न होत असतो. आज शिडवणे नं. १ शाळेमध्ये पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे साजरा केला. मोफत गणवेश , मोफत पाठ्यपुस्तके वाटप , शिक्षणप्रेमी देणगीदारांकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन मुलांना विविध लाभ मिळत आहेत ही मुलांसाठी आणि पालकांसाठी मोलाची बाब आहे. मुलांनी या मोफत मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचे भान ठेवून अधिक अभ्यास करुन समाजाप्रती आपले ऋण फेडावे , अभ्यासात , स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करुन उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती रविंद्र जठार यांनी शिडवणे शाळेच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी बोलताना केले.
प्रारंभी इयत्ता पहिलीच्या सर्व मुलांचे औक्षण करण्यात आले. वाजत गाजत नवागतांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या शुभहस्ते देवी सरस्वतीमाता आणि श्रीगणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मान्यवरांनी दीप प्रज्वलित करुन प्रवेशोत्सवाची सुरुवात केली. शाळेचे मुख्याध्यापक तथा पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन यथोचित स्वागत केले. शाळा प्रवेशोत्सव आणि निपुण भारत अंतर्गत सुरु असलेल्या कार्यक्रमाबद्दल प्रवीण कुबल यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर पहिली ते सातवीच्या एकूण ५१ मुलामुलींना मोफत गणवेश , मोफत पाठ्यपुस्तके समारंभपूर्वक वितरित करण्यात आली. रामदास टक्के आणि ललिता टक्के यांच्या सौजन्याने सर्व मुलांना शिसपेन्सिल , पेन , एकेरी , दुरेघी , चौरेघी आणि चौकटीच्या वह्यांचे वाटप करण्यात आले. शिडवणे गावातील युवती आर्या संजय कोकाटे हिने सर्व मुलांना पेनांचे वाटप केले.
आर्या कोकाटे म्हणाली , " शाळेचा पहिला दिवस असा साजरा केला जातो हे या मुलांचे भाग्य आहे. मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू याचा मला खूप आनंद होत आहे. मुलांनी शिक्षण घेत असताना चिकाटी आणि जिद्द कधीही सोडू नये. मला बारावी सीईटी परीक्षेत ९९ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवताना मला खूप अभ्यास करावा लागला. अभ्यासात यश मिळाले तरी यशाची पाठ सोडू नये. अपयश आले तरी खचून न जाता अभ्यासाची कास सोडू नये. तुम्हाला सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
शिक्षणप्रेमी ज्येष्ठ नागरिक बंडू कोकाटे म्हणाले , " शासनाचा प्रवेशोत्सव उपक्रम स्तुत्य असून शाळेने उपक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केलेले आहे. नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्व मुलांना शुभेच्छा . "
कार्यक्रमप्रसंगी शिडवणे गावचे सरपंच रविंद्रजी शेट्ये , उपसरपंच दिपक पाटणकर , बंडू कोकाटे , मनोहर कोकाटे , ग्रामपंचायत सदस्य दयानंद कुडतरकर , स्मिता टक्के , सुप्रिया पांचाळ , ललिता टक्के , तंटामुक्ती अध्यक्ष तथा माऊली वारकरी संप्रदायाचे पदाधिकारी महेंद्र टक्के , आर्या कोकाटे , पोलीसपाटील समीर कुडतरकर , माजी उपसरपंच अनिल पांचाळ , सचिन टक्के , तारीफ शेख , नदीम शेख , रामचंद्र पाटणकर , शाळा व्यवस्थान समिती उपाध्यक्षा तथा शालेय पोषण आहार स्वयंपाकी समिता सुतार , प्रेरणा कासार्डेकर , आन्वी येतकर , मंजुळा गुंडये , अंगणवाडी सेविका पाटणकर , केतकर , गणेश पाष्टे आणि बहुसंख्य पालक , विद्यार्थी उपस्थित होते.
स्मिता टक्के यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल स्वागत व अभिनंदन करण्यात आले. मावळते सदस्य अनिल पांचाळ यांना यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक , सामाजिक कार्याबद्दल व्यासपीठाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.
शाळा पूर्व तयारी दुसऱ्या मेळाव्याचे मान्यवरांच्या हस्ते लालफीत कापून उदघाटन करण्यात आले. शिक्षकांनी मांडलेल्या विविध शैक्षणिक स्टॉलमध्ये शासकीय परिपत्रकानुसार उपक्रम घेण्यात आले. त्यात मुलांच्या पालकांनी विशेष सहकार्य दिले. माता पालक यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाळेतील उपशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि सीमा वरुणकर यांनी सर्वांचे विशेष आभार मानले. सर्वांना गोड पदार्थ देण्यात आला. मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी सर्वांचे आभार मानले.


































































































































No comments:
Post a Comment