Sunday, January 21, 2024

सह लीला

 🛑 सह लीला


          शालेय जीवनात प्रत्येकाने एकदा तरी शैक्षणिक सहल अनुभवायला हवीच. तशी तर ती दरवर्षी येत असते. पण आपण आपल्या मुलांना दरवर्षीच सहलीला पाठवतोच असे नाही. सहलीला गेल्यावर जाताना आपण ज्या सह लीला एन्जॉय करतो, त्या मोठे झाल्यावर तेवढ्याच एन्जॉय नाही करता येत.

          आमच्या शालेय जीवनात दरवर्षी सहली निघत. दरवर्षी आम्ही हट्ट करत असू. पण प्रत्येकवेळी हट्ट पुरवला जात नसे. आईकडे साकडे घातल्यावर आईने बाबांना साकडे घातल्यावर एखाद्या वेळी बाबा प्रसन्न होत. आम्ही पाच भावंडे असल्याने प्रत्येकवेळी बाबांनी प्रसन्न व्हायलाच पाहिजे असे आम्हांलाही वाटत नसे. आम्हांला एकदा परवानगी मिळाली तरी आम्ही खुश होत असू. आमची आर्थिक परिस्थिती आम्हाला समजत होती. अंथरुण पाहून पाय पसरावेत ही म्हण आम्ही सर्वांनीच अर्थासह पाठ केली होती आणि आचरणातही आणली होती. नव्हे ती आमच्यामध्ये मुळापासून रुजली असावी.

          यंदा आमच्या शाळेची सहल रत्नागिरीला घेऊन जायचे ठरले. आठ दिवसांत पैसेही गोळा झाले. काल परवा नको म्हणालेली मुलेसुद्धा पैसे जमा करु लागली होती. बघता बघता बत्तीस मुलांची नावे फिक्स झाली. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या मुलांची सहलीची वर्गणी सरपंच साहेबांनी दिली ही विशेष उल्लेखनीय बाब होती.

          आम्ही तीन शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पाच शिलेदार आमच्यासोबत होते. आमची चाळीस जणांची टीम सहलीला निघाली. गाडी सकाळी लवकरच शाळेच्या प्रांगणात येऊन पोहोचली. सर्व मुलांना प्रवासी गोळ्या देण्यात आल्या. सर्वांनी नाश्ता आणि जेवण असे दोन डबे सोबत घेतले होते. गाडीला हार घालून पूजा व गाऱ्हाणे करुन गाडी निघाली.

          मुलांनी जाताना ' गणपती बाप्पा मोरया ' चा मोठ्यांदा जयघोष केला. सर्व मुलांचा , शिक्षकांचा आणि पालकांचाही आनंद ओसंडून वाहत होता. मुलांनी गाणी म्हणायला सुरुवात केली. गाडीतील स्पीकर चालू करण्याची विनंती आलीच. मुलांनी ' स्वामी समर्थ ' महाराजांची गाणी ऐकली. पावसच्या स्वामी स्वरूपानंद महाराज यांची सुरेश वाडकरांच्या आवाजातील गाणी ऐकत राहावीशी वाटतात.

          आडीवरे गावातील कनकादित्य मंदिर खूप पुरातन आहे. सुर्य देवतेचे मंदिर हे मंदिर अतिशय छान आहे. सर्वांनी पाय धुऊन मनोभावे नमस्कार केला. मुलांनी तेथील रिकाम्या जागेत बसून आपला नाश्ता केला. तेथील मार्गदर्शकांनी आम्हांला कनकादित्य मंदिराचे महात्म्य सांगितले.

          तेथून थेट निघालो पावसला. स्वामी स्वरूपानंद महाराजांचा आश्रम अतिशय शांत आणि सुंदर आहे. आत प्रवेश करतानाच आपले पाय स्वच्छ धुऊनच आत जायचे असते. आम्ही गेलो त्यावेळी आरतीची तयारी सुरु झालेली दिसली. आम्ही सगळे रांगेत उभे राहिलो. आरती सुरु झाली. आम्हां सर्वांना आरतीचा लाभ मिळाला हे आमचे भाग्यच. आरती म्हणताना मंत्रमुग्ध झालेली मुले पाहून मीही मंत्रमुग्ध झालो. ' ॐ राम कृष्ण हरी ' या मंत्राचा जप करताना मन शांत होत असल्याचा अनुभव आला.

          प्रसादीची वेळ आलीच होती. मुलांना रांगेत प्रसाद घेता आला. गरमागरम खिचडी प्रसाद आणि त्यासोबतची हिरव्या मिरचीची चटणी मुलांनी मनसोक्त आणि मनोभावे भक्षण केली. प्रसादाचे सेवन केल्यानंतर मुलांनी स्वामी स्वरूपानंद महाराजांचे निवासस्थान पाहिले. त्यांना नतमस्तक होऊन आम्ही पुढे निघालो.

          आता आम्ही रत्नागिरीला निघालो. थिबा पॅलेस पाहिला. थिबा पॅलेसमधील ' प्रादेशिक वस्तुसंग्रहालय ' पाहिले. तेथील पुरातन शिल्पे बघून मुलांनी तोंडात बोटे घातली. आता थोडे गरम व्हायला लागले होते. मुलांनी बाहेरील कुल्पीवाल्याकडे थंडगार आईस्क्रीमचा येथेच्छ आनंद घेतला.

          लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान पाहिले. मुलांनी त्यांच्या पुतळ्याजवळ जाऊन फोटो घेतले. जवळच मत्स्यालय आहे. आत गेल्यावर अनेक प्रकारचे जिवंत मासे पाहताना मुलांचे आनंदित दिसणारे चेहरे मी पाहत होतो. त्यांचे हे प्रत्यक्ष अनुभवांचे शिक्षणच घडत होते. ऐतिहासिक आणि शैक्षणिक माहिती शिकवताना जेवढी कठीण असते, त्याहीपेक्षा जास्त ती प्रत्यक्ष अनुभवाने जास्त चांगली कोरली जात असते हे अगदी खरेच आहे.

          मुलांना बोटिंग खूप आवडते. काही मुलांनी आणि मुलींनीसुद्धा बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला. स्वतः बोट चालवली. त्यानंतर आम्ही रत्नदुर्ग किल्ल्याकडे रवाना झालो. किल्ला पाहिला. भगवती मंदिर पाहिले. मुलांचे फोटो सेशन झाले. उंच कड्यावरून समुद्र डोळ्यात भरुन घेताना मुलांच्या उत्साहाला उधाणच आले होते.

          आता गणपतीपुळ्याला जायला निघालो. वाटेत जाताना भाट्याचा पूल व आरेवारे रनिंग पॉईंटमध्ये पाहिले. हे पॉईंट बघताना मुलांना खाली उतरावं असं वाटत होतं. पण अंधार पडण्यापूर्वी आम्हाला गणपतीपुळे गाठायचे होते.

          गणपतीपुळ्याचे गणपती मंदिर दिसू लागले. सागर किनारा मुलांना खुणावू लागला. फेसाळणारा समुद्र आणि किनाऱ्यावर धडाधड आपटणाऱ्या लाटा यांचं आकर्षण होतंच. एक डबा संपलाच नव्हता. दुपारी खिचडी प्रसादामुळे दुसरा डबा आमच्या खाण्याचीच वाट बघत होता. त्या समुद्रकिनाऱ्यावरील एका छोट्या टपरीवर आम्ही काही काळ विसावलो. मुलांनी आपले डबे भराभर उघडले. भूक सपाटून लागली होती. मुले डबे खात होती, पण लक्ष समुद्राकडे होते. शेवटी डबे संपले. घटाघट पाणी पिऊन आमची विद्यार्थी सेना निघाली समुद्राच्या दिशेने. आम्ही मुलांचे आठ गट केले. प्रत्येक मोठ्या माणसाकडे 4 मुले वाटून दिली. त्यामुळे 5-5 चे एकूण आठ गट झाले. मुले आणि मोठी माणसे समुद्राच्या लाटांमध्ये बेधडक घुसली. पुढे पुढे जायला लागली. लाटांच्या धडका धडकू लागल्या होत्या. एखादी मोठी लाट खूप येताना पाहून मुलांचा आनंद गगनात मावत नव्हता. मुले अजून अजून पुढे सरकत होती. जी मुले खूप पुढे गेली, ती चांगलीच भिजली. भिजली तरी त्यांचे समाधान होत नव्हते. त्यांना आवरताना मोठ्यांनाही त्यांच्या मागे जाताना भिजावेच लागले. आता मात्र मर्यादा संपली होती. त्यांना मागे येण्यासाठी मोठ्यांदा ऑर्डर द्यावी लागली. सर्व पुढे गेलेले मुलगे मागे आले. काही मुले वाळूत किल्ले आणि काहीतरी बनवू पाहत होती. काही पळणाऱ्या खेकड्यांना धरु पाहत होती. त्यांच्या आनंदाचा समुद्र दुथडी भरुन वाहू लागला होता. पायाखालची सरकणारी वाळू पाहून एक दोन मुले मला म्हणालीही, " सर, पायाखालची जमीन सरकते आहे ? " पर्यटकांची गर्दी होतीच. त्यांच्यासाठी गाड्यासुद्धा किनाऱ्यावरुन धावत होत्या. उंटावरून जाणारी मुलेसुद्धा दिसत होती. घोडगाड्या होत्या. सूर्य आभाळातून लवकर खाली येऊ पहात होता. ते दृश्य अतिशय विलोभनीय दिसत होते. अखेर सर्व मुले समुद्रातून किनाऱ्यावर आली. आमचा जीव भांड्यात पडला. प्रत्येक स्पॉटला हजेरी घेणे सुरु होते.

          सूर्यास्ताची वेळ आणि आमची मंदिरात जाण्याची वेळ एकच झाली होती. आम्ही आणि आमची मुले भिजलेली पाहून आम्हांला आत प्रवेश नाकारण्यात आला. त्यासाठी 5 ते 10 मिनिटे मुलांना सुकवावे लागले. शाळेतील मुलांची सहल आहे म्हटल्यावर व यादी दाखवल्यावर त्यांनी लगेच सर्वांना प्रवेश दिला.

          गणपतीचे प्रत्यक्ष आणि व्यवस्थित दर्शन घडले. मुलांनी गणपतीपुळ्याचा गणपती ' नवरा माझा नवसाचा ' या चित्रपटात पाहिला होता. आज त्यांनी तो प्रत्यक्ष पाहिला आणि रांगेत जाऊन प्रसाद घेतला. प्रसाद घेऊन बाहेर पडल्यावर पुन्हा बीचवर मज्जा करण्याचा विचार मुलांच्या मनात घोळत होता. सूर्याचा अस्त होताना पाहणे ही एक विलक्षण गोष्ट मुलांनी पाहिली.

          पुन्हा काही मुलांनी खरेदी सुरु केली. त्यांना मनसोक्त खाऊ आणि काही गोष्टी घेण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे देण्यात आली. तीही त्यांना पुरेनात. त्यांच्याकडील सर्व पैसे संपेपर्यंत त्यांना खरेदी करायची होती. खरेदी संपली, जेव्हा सगळे पैसे संपले. आता मुले परतीच्या प्रवासाला निघाली.

          गणरायाला पुनःश्च वंदन करुन आणि जयघोष करुन आमची टूर परतीच्या प्रवासाला निघाली. मुलांनी भेंड्या सुरु केल्या. त्यात शिक्षकही सामील झाले. मुलांचे गाण्यांचे ज्ञान पाहून खरंच आमचं ज्ञान कमी पडलं. त्यांना कितीतरी गाणी येतात, फक्त त्यांना असं मोकळं व्यासपीठ मिळायला हवं असतं. आणि मोकळं व्यासपीठ आम्ही त्यांना दिलंच होतं. त्याचं ती सोनं करत होती. वर्गात नेहमीच गप्प असणारी मुले आज वेगळीच दिसत होती. त्यांच्यात कोणीतरी संचारले होते. असा उत्साह वर्गात शिकताना त्यांच्या अंगात शिरला तर किती बरे होईल असे मला वाटून गेले.

          रात्र झाली. गाडीने वेग घेतला होता. मुलांचा उत्साहाचा वेग हळूहळू संपत चालला होता. काही मुलांनी छान झोप घेतली. काही मुलांचा उत्साह संपता संपत नव्हता. आता पालकांचे फोन यायला सुरुवात झाली. रात्री साडे दहा वाजता गाडी शाळेच्या प्रांगणात पोचली. पालकांनी मुलांना भेटण्यासाठी गाडीकडे झेप घेतली. मुलेही आपल्या पालकांच्या स्वाधीन झाली. आम्ही सगळे सुखरूप पोहोचलो म्हणून मी देवाचे खूपखूप आभार मानले. सहलीच्या या सह लीला सर्वांनाच नक्कीच कायम स्मरणात राहतील अशाच होत्या.

©️ प्रवीण कुबलसर, मुख्याध्यापक, शिडवणे नं.1












































































































































No comments:

Post a Comment

सर्वांचे हार्दिक स्वागत

🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳

 🚩 शिडवणे नं. १ शाळेत प्रजासत्ताक दिन सोहळा दिमाखात संपन्न! 🇮🇳 ​शिडवणे नं. १ येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन आच...