🛑 वनभोजन : एक उत्साह सोहळा
वनातील भोजन हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो. चार भिंतीतील बंदिस्त खोलीतील भोजनापेक्षा सर्वांच्या उपस्थितीत भोजन करण्याचा आनंदच वेगळा असतो. एक उनाड दिवस असला तरी आयुष्याला एकत्रित जीवन जगण्याचे प्रशिक्षण यातूनच मिळत असते. सगळी मुले, माणसे एकत्र येतात. मिळून मिसळून अनेकांच्या एका विचाराने घडणारा हा सोहळा आनंदाला उधाणच आणत असतो.
बालपणी आम्ही प्रतिवर्षी एका शालेय वनभोजनाचा स्वानंद अनुभवलेला आहे. आईने सकाळी लवकर उठून बनवून दिलेली गोड सोलीव बटाटा भाजी, पुऱ्या अजून जशाच्या तशा आठवतात. आमचं वनभोजन नेहमी स्वयंभूच्या देवळात नाहीतर मुरेडोंगरी येथे जात असे. खेळायला मोठे मैदान, उघडे माळ आम्हाला खेळायला मिळत असत. सर्व मुले क्रिकेटच्या बॅटी घेऊन येत. कधी नाही ते त्यावेळी क्रिकेट खेळायला मिळे. कधीतरीच खेळल्यामुळे माझा पहिल्या दोन तीन चेंडूतच त्रिफळा उडे. बॅटिंग जमली नाही तर बॉलिंगला वाव असे. एखादा दुसरा विकेट पाडण्यात मी पटाईत होतो. आता यातील काहीही जमताना दिसत नाही.
यंदा 17 जानेवारीला आमच्या शिडवणे नं.1 शाळेची मुले, पालक, पदाधिकारी मिळून वनभोजन साजरे केले. वारगावमधील स्नेह रिसॉर्ट अतिशय सुंदर स्पॉट आहे. आम्हाला त्यांच्या मालकांनी लगेच परवानगी दिली. जळाऊ लाकडे, पाणी, चहा यांचीही व्यवस्था त्यांनीच केली.
वनभोजन असल्यामुळे शाळेतील सर्व मुले खूप उत्साहाने शाळेत आली होती. त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा असा हा आनंद मला दुर्मिळ नव्हताच. असे आनंद निर्माण करण्याचं भाग्य या शिक्षकी पेशात आहे याचा मला नेहमीच अभिमान वाटत राहतो. सर्वांच्या सहकार्याने वनभोजनाची तयारी सुरु करण्यात आली.
मुलांना अशा वेळी भेळीचे खूप आकर्षण असते. शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ या उपक्रमात हिरीरीने सहभागी होत असतात. त्यामुळे मुलांसोबत आम्हां शिक्षकांचाही आनंद द्विगुणित होत असतो. महिला सदस्यांनी सुंदर चविष्ठ भेळ बनवली. कोथिंबीरीचा वास सर्वदूर आधीच पसरला होता. मुलांनी मजेत जिथे बसायला मिळेल तिथे बसून भेळीचा मनसोक्त स्वाद घेतला. भेळ पुन्हा पुन्हा मागून घेतानाही मुले अजिबात लाजली नाहीत हे विशेष. त्यात आमचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते.
वनात जाऊन तिथेच भोजन करुन जेवण्यात खरी मजा असते. उपस्थित सर्व महिला मंडळ गेल्यापासून कामाला लागले होते. आपण पदाधिकारी आहोत हे विसरून शाळेतील मुलांच्या आनंदामध्ये आनंद शोधणारी ही सर्व मोठी माणसे ग्रेट म्हणायला हवीत. त्यांनी अतिशय आनंदाने, हसतमुखाने केलेले भोजन खऱ्या अर्थाने वनभोजन ठरले होते.
मुले मस्त मजेत खेळत होती. कॅरम, सापशिडी, क्रिकेट, बॅडमिंटन, दोरीउड्या या सर्व खेळांना बहर आला होता. आम्ही शिक्षकही त्यात सामील व्हायला अजिबात मागेपुढे पाहत नव्हतो. आम्हांलाही आमचे ते रम्य दिवस आठवत होते. काही मुली डान्स करण्यात मग्न होती. त्या सर्व डान्सर मुली बागेतील ब्लूटूथ वर लावलेल्या गाण्यांवर थिरकत होत्या. कधीही डान्स न करणारी मुलेसुद्धा त्यात सामील झालेली दिसली.
हे सर्व खेळताना त्यांना बागेतील निसर्ग सौंदर्य आकर्षित करुन घेत होते. बागेतील शेळ्या, रंगीबेरंगी पक्षी, त्यांचे विविध आवाज, टर्की पक्षी, इमू पक्षी, त्याने नुकतेच घातलेले अंडे आणि पायाखाली अंथरलेले पांढरेशुभ्र रंगाचे छोटे दगड, विविध झाडे सर्वच ' आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ' असेच होते.
जेवणाची वेळ झाली तरी मुलांचे आपल्या भुकेकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांना सांगावे लागले तेव्हा त्यांना जेवणाची आठवण आली. या मुलांसाठी शाळेतील असे क्षण नेहमीच अविस्मरणीय असतात. त्यांच्या आयुष्यातील हे असे वनभोजन नेहमीच असाच अवर्णनीय आनंद घेऊन येवो. सर्व मुले श्रीखंड पुरी, कुर्मा पुरी आणि पूर्णांन्न खाण्यात कधीच दंग होऊन गेली. एक दोन तीन चार करत कधी पुऱ्यांचा फडशा पाडला ते त्यांचे त्यांनाही कळले नसावे.
गावातील पदाधिकारी यांनीही वनातील दिव्य भोजनाचा आनंद घेतला. स्नेह रिसॉर्ट मधील आमचे हे वनातील स्नेहभोजन खऱ्या अर्थाने स्नेहपूर्ण वनभोजन ठरले होते.
©️ प्रवीण कुबलसर, मुख्याध्यापक शिडवणे नं.1























































































































































No comments:
Post a Comment