🔴 बालसाहित्य संमेलनात चिमुकल्या कवींची बहार; 'काव्यसंग्रह' लवकरच प्रकाशित होणार!
शिडवणे नं. 1: येथील शिडवणे नं. 1 शाळेमध्ये आज दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी बालसाहित्य संमेलनाचा उत्साहपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला. या संमेलनात इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर आणि लयबद्ध स्वरचित कवितांचे प्रभावी सादरीकरण केले.
या बाल कवींच्या सृजनशीलतेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. केतन, श्रेया, उत्कर्ष, आर्यन, मयुरी, चिन्मय, धनश्री, अनुष्का, फरीन, फरान, शफा, वैष्णवी, सबा, तनिष्का, जोया, श्रावणी पाष्टे आणि हर्षद यांसारख्या अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे आपल्या कविता सादर केल्या. त्यांच्या बालविश्वातील कल्पना, भावना आणि निरीक्षणे या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त झाली.
विशेष म्हणजे, शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कुबल यांनी देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी सातवीच्या विद्यार्थ्यांवर आधारित दोन सुंदर कवितांचे सादरीकरण केले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.
या बालसाहित्य संमेलनाची आणखी एक विशेष बाब म्हणजे मुलांनी लिहिलेल्या निवडक कवितांचा 'काव्यसंग्रह' लवकरच प्रकाशित होणार आहे. शाळेने यासाठी 1 मे 2025 या महाराष्ट्र दिनाचा शुभ मुहूर्त निवडला आहे. या काव्यसंग्रहातून बाल कवींच्या प्रतिभा आणि कल्पनाशक्तीची झलक सर्वांना अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार निकेत पावसकर उद्या, गुरुवार दिनांक 17 एप्रिल रोजी शाळेत अक्षर संग्रह प्रदर्शन दाखवणार आहेत. या प्रदर्शनात विविध प्रकारच्या अक्षरांची माहिती आणि कलात्मक मांडणी पाहायला मिळेल. या कार्यक्रमात कु. श्रेया पाळेकर ही शालेय स्वराज्य मंडळाची मुख्यमंत्री लेखक / कवी निकेत पावसकर यांची मुलाखत घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एका अनुभवी लेखकाशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
आजच्या बालसाहित्य संमेलनाने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड आणि निर्मितीची प्रेरणा जागृत केली, यात शंका नाही. मुख्याध्यापक प्रवीण कुबल आणि सर्व शिक्षकवृंदांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. बाल कवींच्या या सुंदर प्रयत्नांना आणि त्यांच्या आगामी काव्यसंग्रहाला शुभेच्छा!




No comments:
Post a Comment