शिडवणे नं . १ शाळेचे २०२४ - २५ चे वनभोजन नाधवडे उमाळा या निसर्गरम्य स्थळी अतिशय दिमाखात संपन्न झाले . त्यावेळी शाळेतील व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी , शिक्षकवृंद , शाळा व्यवस्थापन समिती , शिक्षक पालक संघ , माता पालक संघ आणि बहुसंख्य पालक उपस्थित होते .
मुलांनी सकाळी ९ वाजता शाळेकडून प्रयाण केले. गांगेश्वराला नारळ ठेवून व गाऱ्हाणे घालून वनभोजनाला जाण्यासाठी मुले व सर्वजण तयार झाली . नाधवडे गावातील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध पर्यटन स्थळ व तीर्थक्षेत्र म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील जागृत देवस्थान आहे . तेथे कायमचा झरा वाहत असताना सर्व मुलांनी पाहिला. पाण्याचे प्राशन करुन तहान भागवली .
गेल्यानंतर सर्व महिला पदाधिकारी यांनी मुलांसाठी चवदार भेळ बनविली . मुलांनी त्यावर आनंदाने ताव मारला . निसर्ग निवासात बसून भेळ खाण्यातला आनंद सर्व मुले , माणसे घेताना दिसत होती . वनात जाऊन स्वतः जेवण बनवून जेवण्याचा आनंद वेगळाच असतो . वर्षातून एक दिवस असा साजरा करताना अधिकारी व शिक्षक मित्रांनीही सदिच्छा भेट दिली . कासार्डे / खारेपाटण / शेर्पे केंद्राचे केंद्रप्रमुख संजय पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत विनायक जाधवसर , जाकीर शेखसर , संतोष वळंजूसर , भाई पाटीलसर यांच्या सदिच्छा भेटीमुळे सर्वानाच अतिशय आनंद झाला. दुपारपर्यंत मुलांनी क्रिकेट , फुटबॉल , दोरीउड्या , भेंड्या आणि अनेक खेळांचा स्वानंद घेतला . महादेव मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेतले . निसर्ग सौदर्य न्याहाळले . पाण्यामध्ये आपले पाय थंड केले .
जेवणापूर्वी वैभववाडी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनीही मुलांना सामान्यज्ञान विषयक अधिक माहिती दिली व सर्व मुलांना थंड पेय दिले . त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे आभार .
दुपारी ठिक दोन वाजता सर्व मुलांनी कुर्मा पुरी , श्रीखंड , गोड डाळ , पापड , लोणचे , भात आणि कोशिंबीर अशा स्वादिष्ट भोजनाचा स्वाद घेतला . त्यावेळी उपस्थित सर्वांनीच येथेच्छ भोजन केले . सर्व महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारी यांनी शाळेसाठी दिलेल्या अनमोल सहाय्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकांनी कितीही आभार मानले तरीही कमीच पडतील . शिडवणे गावातील सर्व पदाधिकारी आणि पालक , ग्रामस्थ यांच्या नियमितच्या सहाय्याबद्दल सर्व शिक्षकवृंदांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करीत आहोत . मदतीला असे अनेक हात नेहमीच पुढे सरसावतात , त्यांना गांगेश्वर आणखी बळ देण्यासाठी प्रार्थना करतो . शिडवणे नं . १ शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी वनभोजनासाठी दिलेल्या उत्स्फूर्त साहाय्याबद्दल त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो .
© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं . १



























































































































.jpg)


No comments:
Post a Comment